Coronavirus Lockdown : घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही, इंडियन ऑईलनं दिलं स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर अनेक लोकांनी गॅस सिलिंडरसाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सिलिंडरसाठी लोकांच्या मोठ्या रांगा लावल्या जात आहेत. दरम्यान, गॅस सिलींडर मिळणार नाही या अपवेने ग्राहकांनी कोणीही घाबरून जाऊ नये. तसेच सिलिंडर बुक करू नये. आपल्याकडे सिलिंडर साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असे इंडियन ऑईलकडून सांगण्यात आले आहे.

देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे, अशी माहिती इंडियन ऑईलचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी दिली. सध्या देशातील सर्व प्रकल्प आणि सप्लाय लोकेशन सुरू आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही भीती बाळगून घाईत सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. आम्ही एप्रिल महिन्यात आणि त्यानंतर लागणार्‍या महिन्यांतील इंधनाबाबत माहिती घेतली आहे. त्या दृष्टीने आमचे प्रकल्प काम करत आहे. याव्यतिरिक्त बल्क स्टोरेज पॉईंट्स, एलपीजी डिस्ट्रिब्यूशनशिप आणि पेट्रोल पंप योग्यरित्या काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लॉकडाउनमुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे मार्च महिन्यात पेट्रोलच्या मागणीत आठ टक्क्यांची घट झाली आहे. तर डिझेलच्या मागणीतही 16 टक्क्यांची घट झाली आहे. याव्यतिरिक्त एटीएफची मागणीही 20 टक्क्यांनी घसरल्याचं सिंग यांनी सांगितले आहे. मात्र, या महिन्यात एलपीजीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आम्ही सर्व ग्राहकांपर्यंत योग्यरित्या ही सेवा पोहोचवत आहोत. लॉकडाउन नंतर एलपीजीच्या मागणीत 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मात्र, तरीही नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगून सिलिंडर बुक करण्याची गरज नाही.