इंधन दरात वाढ सुरूच; मुंबईत विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशात महागाई वाढू लागली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा भाव विक्रमी ९९.९४ रुपये इतका झाला असून शंभरी गाठण्यासाठी अवघे ६ पैसे कमी आहेत. दरम्यान, मुंबईत यापूर्वीच प्रीमियम पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. आता साधे पेट्रोल १०० रुपये होण्यासाठी ६ पैसे कमी आहेत. उद्या किंवा परवा पेट्रोल शंभरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली आहे.

आजचे दर
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली ९३.६८ ८४.६१
चेन्नई ९५.२८ ८९.३९
कोलकाता ९३.७२ ८७. ४६
मुंबई ९९.९४ ९१.८७

दरम्यान, कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणण्यानुसार, ७० डॉलरच्या नजीक क्रूडचा भाव पोहोचला आहे. इंधन मागणी वाढल्याने सध्या तेलाची बाजारपेठ तेजीत आहे. २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्युटच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत तेलाचा साठा ४.३९ दशलक्ष बॅरल आहे. त्यामुळे संपूर्ण आठवड्यात इंधनाला मागणी राहील. बुधवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.०८ डॉलरने वधारला आणि ६८.७३ डॉलर प्रती बॅरल झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.०५ डॉलरच्या तेजीसह ६६.०६ डॉलर प्रती बॅरल झाला.