सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. रविवारी (दि.२६) सलग चौथ्या दिवशी दरवाढ करत तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर १४ पैसे तर कोलकत्तामध्ये १३ पैशांची वाढ झाली. डिझेलच्या दरामध्ये दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईत सात पैसे तर चेन्नईत आठ पैसे प्रतिलीटर महागले.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार रविवारी दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर वाढवण्यात आले आहेत. दिल्लीत पेट्रोल ७१.६७, कोलकत्ता ७३.७३, मुंबई ७७.२८ आणि चेन्नईमध्ये ७४.३९ रुपये प्रतिलीटर पेट्रोलचे दर झाले आहेत. डीझेलचे दर देखील वाढले आहे. दिल्लीत ६६.६४, कोलकत्ता ६८.४०, मुंबई ६९.८३ आणि चेन्नईत ७०.४५ रुपये प्रतिलीटर डिझेलचे दर झाले आहेत.

देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. निकालानंतर दुधाच्या दरात वाढ झाली तर दुस-या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. सलग चौथ्या दिवशी दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.