… म्हणून आगामी 10 दिवसात प्रति लिटर 5 ते 6 रूपयांनी ‘स्वस्त’ होऊ शकतं ‘पेट्रोल-डिझेल’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. सोमवारी जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमतीत कपात आणि उत्पादन कपात यावर OPECशी चर्चा न केल्याने जागतिक पातळीवर क्रुड ऑइलच्या किमतीमध्ये कमालीची घसरण झाल्यामुळे जागतिक तेल बाजारपेठ हाहाकार माजला. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत 30 टक्क्यानी घसरून 35 डॉलर प्रति बॅरलवर गेली.
कच्च्या तेलाच्या किंमतीतील ही मोठी घसरण झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीदेखील मोठ्या प्रमाणात खाली आल्या पाहिजेत, पण तसे दिसले नाही. इंडियन ऑईलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत पेट्रोलियमद्वारे उत्पादनांच्या किंमतींचा सरासरी 15 दिवस आढावा घेतला जातो. म्हणूनच, ग्राहकांनी प्रतीक्षा करण्यासोबतच अशी अपेक्षा केली पाहिजे की कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आणखी घसरण होईल किंवा सध्याची किंमत कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होईल. असे झाल्यास, पुढच्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 5 ते 6 रुपयांची कपात होऊ शकते.
बुधवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 70.29 रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर 63.01 रुपये होती. विशेष म्हणजे तेलाच्या क्षेत्रातील विश्लेषक म्हणाले की, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती क्रुड ऑईलच्या इंडियन बास्केटच्या किमतींना ट्रॅक करतात. जी किंमत सध्या जादा आहे (45 डॉलर प्रति बॅरल). ते म्हणाले की, या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमकुवततेमुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना होत नाहीये, कारण आता डॉलर खरेदी करण्यासाठी आणि तेल आयात करण्यासाठी कंपन्यांना जास्त पैसे द्यावे लागतील.
याशिवाय कच्च्या तेलाचे कमी दर पाहता सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवू नये. अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे की त्यामुळे महागाईचा दबाव वाढेल आणि आर्थिक सुस्ती मध्ये हे एका शाॅकप्रमाणे असेल. जर केंद्र आणि राज्य सरकारांनी पेट्रोलियम उत्पादनांवर शुल्क वाढवले नाही तर ग्राहकांना चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळू शकेल.