पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रूपयांपेक्षा जास्तीने वाढ होण्याची शक्यता – रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर आता तेल कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोलचे दर 19 पैसे तर डिझेल 21 पैसे लिटरने वाढले आहे. त्यानंतर आता पेट्रोलचे दर 5 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

तेल कंपन्यांनी जर मार्जिनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेऊन तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला तर पेट्रोल 5.50 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी वाढणार आहे. याबाबतची माहिती क्रेडिट सुईसने एका रिपोर्टच्या माध्यमातून दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने आता कंपन्यांकडून मार्केटिंग मार्जिन सुधारण्यावर जोर दिला जाणार आहे. तसेच या रिपोर्टमध्ये म्हटले, की राज्यांतील निवडणुका आता संपल्या आहेत. आम्हाला वाटतं की आता तेल मार्केटिंग कंपन्यांचे इंधनाच्या दरात वाढ होऊ शकेल.

याशिवाय तेल कंपन्यांना जर मार्जिन आर्थिक वर्ष 2019-20 च्या स्तरावरच ठेवायचा असेल तर त्यांना डिझेलचे दर 2.80 रुपये ते 3 रुपये आणि पेट्रोलच्या किमती 5.5 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ करावी लागू शकते. या सर्व परिस्थितीचा विचार करता आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.