Petrol Diesel Price Pune | पेट्रोल, डिझेलबरोबरच आता CNG च्या दरवाढीचा ‘भडका’ ! जाणून घ्या आजचे नवे दर

पुणे : पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये (Petrol Diesel Price Pune) दररोज वाढ होत असताना आता सीएनजीच्या (CNG) भाववाढीचा फटका वाहनचालकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री केंद्र सरकारने सीएनजीच्या दरात किलोमागे तब्बल २ रुपये ६० पैशांनी वाढ केली आहे. या आठवड्याभरात सीएनजी तब्बल ४ रुपये ६० पैशांनी महागले आहे. पुण्यात आता सीएनजीचा दर प्रतिकिलो ६२.१० रुपये इतका झाला आहे. या दरात आणखी वाढ (Petrol Diesel Price Pune) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३४ पैशांनी आज वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता पेट्रोलचा दर ११०.२५ रुपये लिटर झाला आहे.
पेट्रोलबरोबरच डिझेलच्या दरात प्रति लिटर ३६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलचा दर ९९.३६ रुपये लिटर इतका झाला आहे.
पॉवर पेट्रोलही आज लिटरमागे ३६ पैशांनी महागले आहे. पॉवर पेट्रोलचा पुण्यातील दर ११३.९३ रुपये लिटर झाले आहे.
पेट्रोल महाग होत असल्याने अनेक वाहनचालकांनी सीएनजी गाड्या घेण्याकडे कल झाला आहे. शहरातील रिक्षा तसेच बसगाड्या या प्रामुख्याने सीएनजीवर चालविण्यात येत आहे. त्यांनाही या दरवाढीची झळ बसणार आहे. सीएनजीच्या सध्याच्या व संभाव्य दरवाढीमुळे आता रिक्षांच्या दरवाढीची मागणी होण्याची शक्यता असून त्याचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.