पोस्टरबाजी करत युवा सेनेने मोदी सरकारवर साधला निशाणा, म्हणाले – ‘यही है अच्छे दिन ?’

पोलीसनामा ऑनलाईनः दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. अच्चे दिन आनेवाले है असे म्हणत सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या काळात इंधनाचे दर आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडत आहेत. अगोदरच लॉकडाउनमुळे आर्थिक झळ बसलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर इंधन आणि गॅस दरवाढीमुळे बोझा पडला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून शिवसेनेची युथ विंग असलेल्या युवा सेनेने यही है अच्छे दिन? असा सवाल करत मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी सुरू केली आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरात रस्त्यांच्या बाजूला आणि पेट्रोल पंपावर युवा सेनेने होर्डिंग्ज लावून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यात होर्डिंग्जवर 2015 आणि 2021 मधील पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरातील तफावत दाखवून देत युवा सेनेने हेच आहेत अच्छे दिन ? असा उपरोधिक सवाल केला आहे. 2015 मध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर 572 रुपयांना मिळत होता. त्याची किंमत वाढून हा सिलेंडर आता 719 रुपयांपर्यंत वाढल्याचे पोस्टरवर म्हटले आहे. तसेच 2015 मध्ये प्रती लिटर 52 रुपयांना मिळणाऱ्या डिझलचे दर 2021 मध्ये 88.6 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 64.60 रुपये प्रती लीटर मिळणा-या पेट्रोलचे दरही आता 96.62 रुपयांवर पोहचल्याचे युवासेनेने पोस्टरच्या माध्यमातून म्हटले आहे.