Petrol-Diesel Price : 50 दिवसानंतर डिझल 7.10 आणि पेट्रोल 1.67 रूपयांनी झालं महाग, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती ५० दिवसानंतर वाढवल्या आहेत. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईलने दिल्लीत डिझेलच्या दरात प्रतिलिटर ७.१० रुपये आणि पेट्रोलच्या दरात १.६७ रुपयांनी वाढ केली आहे.

राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून ७१.२६ रुपये असून एक लिटर डिझेलसाठी ६९.३९ रुपये द्यावे लागतील. यापूर्वी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर ६९.५९ रुपये तर डिझेलची किंमत ६२.२९ रुपये प्रति लिटर होती.

दिल्ली सरकारने व्हॅट वाढवला
दिल्ली सरकारने मंगळवारी पेट्रोलवरील व्हॅट २७ टक्के वरुन ३० टक्के, तर डिझेलवरील व्हॅट १६.७५ टक्क्यांवरून ३० टक्के वाढवला आहे. व्हॅट वाढवल्यामुळे डिझेलच्या दरात ७.१० रुपये आणि पेट्रोलच्या दरात १.६७ रुपयांची वाढ झाली आहे.

चेन्नई मध्येही बदलले पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली व्यतिरिक्त चेन्नईमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलवर प्रतिलिटर ३.२६ आणि डिझेलवर २.५१ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ७५.५४ रुपये तर डिझेलची किंमत ६५.७१ रुपये प्रतिलिटर झाली आहे.

असे चेक करा आपल्या शहरातील दर
आपण एसएमएसद्वारे दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या नंबरवर आणि एचपीसीएलचे ग्राहक HPPRICE <डीलर कोड> ९२२२२०११२२ वर पाठवू शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP <डीलर कोड> ९२२३११२२२२ पाठवू शकतात.

या राज्यांमध्येही महागले तेल
याअगोदर नागालँड, आसाम, मेघालय या तीन राज्यांनी कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी तेलाच्या किंमती वाढवल्या आहेत. या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर वाढवला आहे. नागालँडने पेट्रोलवर प्रतिलिटर ६ रुपये आणि डिझेलवर ५ रुपये प्रतिलिटर कोविड-१९ उपकर लावला आहे. हा निर्णय २८ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अंमलात लागू झाला आहे.

आसाममध्ये पेट्रोलची किंमत ७१.६१ रुपयांवरून ७७.४६ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलची किंमत ६५.०७ रुपयांवरून ७०.५० रुपये प्रती लिटर झाली आहे. सुधारित दर २२ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. करात वाढ झाल्याने आसाममधील पेट्रोल-डिझेलच्या दरात ६ रुपयांची वाढ झाली.

तसेच मेघालयमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ७४.९ रुपये आणि डिझेलची किंमत ६७.५ रुपये झाली आहे. एका सरकारी अधिसूचनेनुसार पेट्रोलसाठी टॅक्सचे नवीन दर ३१ टक्के किंवा १७.६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलसाठी २२.५ टक्के किंवा १२.५ रुपये प्रति लीटर आहे. नोटीसमध्ये असे म्हटले की पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवर २% विक्री कर अधिभार आकारला जाईल.