मुंबईसह राज्यात ‘पेट्रोल-डिझेल’च्या किमतीत वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला ‘कात्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात इंधन दराचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत विक्रमी नोंद झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्यावर गेले आहेत. नुकतीच सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल- डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांनी वाढ केली आहे. कोरोना काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात होणारी वाढ ही सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

राज्यातील साधारण 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीने 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईतदेखील या किमती 90 रुपयांच्यावर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत डिझेल 24 पैशांनी वाढून 79.66 रुपयांवर गेले आहे, तर पेट्रोलच्या किमतीत 20 पैशांनी वाढ झाली आहे. राज्यातील परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, बुलढाणा जिल्ह्यांत डिझेलच्या किमती 80 रुपये प्रतिलिटरच्या वर गेल्या आहेत. राज्यात सर्वाधिक दर परभणीत आहेत. परभणीत पेट्रोलच्या किमती 91.95 रुपयांवर पोहाेचल्या आहेत. इंधनदरवाढीमुळे नागरिकांत नाराजीचा सूर आहे.