लोकसभा निवडणुकीनंतर वाहनधारकांना मोठा झटका ! पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

नवी दिल्ली : IANS वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा पार पडत नाही तोच पेट्रोल कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलमध्ये लिटरमागे ९ पैश्यांची वाढ झाली तर कोलकात्यात ८ पैसे तर चेन्नईत १० पैश्यांची वाढ करण्यात आली आहे.

रविवारी मतदान पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या भाववाढीमुळे भारतात याचा परिणाम झाल्याचे जाणकार सांगत आहेत. आणखी एक आठवडा या दरांमध्ये वाढ होत राहणार असल्याची माहिती देखील जाणकार देत आहेत. आठवड्यभरात लिटरमागे २ ते ३ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, दिल्लीत पेट्रोलचे भाव ७१. १२ रुपये प्रतिलिटर तर कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर अनुक्रमे ७३. १९ रुपये, ७६. ७३ रुपये आणि ७३. ८२ रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. तर या चार महानगरांमध्ये डिझेलच्या किंमती अनुक्रमे ६६. ११ रुपये, ६७. ८६ रुपये, ६९. २७ रुपये आणि ६९. ८८ रुपये प्रति लिटर इतक्या झाल्या आहेत.