मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जाण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील जनता चांगलीच त्रस्त आहे. तसेच अनेक राज्यात लॉकडाऊनसदृश्य निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक गणितही कोलमडले आहे. असे असताना आता मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर याचा निर्णय होऊ शकतो असा अंदाज आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. सध्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्यातील 4 राज्यांतील मतदान पार पडले. मात्र, पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान बाकी आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडणार आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाईल, अशी माहिती देण्यात येत आहे. यात डिझेलच्या किमती 2 ते 3 रुपयांनी वाढू शकतात. मात्र, ही दरवाढ एकदाच होणार नाही तर हळूहळू होईल. यापूर्वी पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये 27 फेब्रुवारीपासून वाढ झालेली नाही. त्यानंतर मार्च, एप्रिल महिन्यात इंधनाच्या दरात चारवेळा कपात झाली. मात्र, आता याचे दर वाढणार आहेत.

दरम्यान, देशात लागू असलेल्या कडक निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यास इतर काही सेवांवरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे या दरवाढीनंतर इतर वस्तू आणि सेवा पुरवठ्यावर याचा परिणाम होऊन त्याचे दरही वाढणार आहेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.