पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज पेट्रोलच्या दरात ७ पैसे तर डिझेलच्या दरात ९ पैशानी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर ७८. ५९ आणि डिझेलचा दर ६९. ७५ प्रति लीटर रुपयांवर पोहोचला आहे. अमेरिकेने ओपेक देश आणि इराणवर निर्बंध लादल्याने आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

मागील १० दिवसांमध्ये डिझेलमध्ये ३० पैशांची वाढ नोंदविली गेली. तर पेट्रोलमध्ये ५-७ पैशांचा चढउतार पहायला मिळाला. १ एप्रिलला पेट्रोलची किंमत ७८. ४३ पैसे होती, तर डिझेलची किंमत ६९. १७ पैसे होती. आशियाई बाजारात ब्रेंट क्रूडच्या बॅरलची किंमत ७४. ५३ डॉलर होती.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता –

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सलग वाढ होत असल्याचं दिसत आहे त्यामुळे आगामी काळात इंधन दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिकेने ईराणवर CAATSA (Countering America’s Adversaries Through Sanctions Act) अंतर्गत सँक्शन घातल्यामुळे या देशासोबत कुणालाही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका चीन आणि भारताला बसणार आहे. यामुळे कच्च्या तेलाची मागणी तीन ते पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर महागाई वाढण्याचाही धोका आहे.