दिलासादायक ! पेट्रोल, डिझेलच्या दरात 15 दिवसानंतर कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी (दि. 15) इंधन दरात किरकोळ कपात केली. पेट्रोल दरात 16 पैशांची तर डिझेल भावात 14 पैशांची कपात केली आहे. सलग पंधरा दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर तेल कंपन्यांनी ही कपात केली आहे. ताज्या दरकपातीनंतर दिल्लीतील पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर 90.56 रुपयांवरून 90.40 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 80.87 रुपयांवरून 80.73 रुपयापर्यंत खाली आले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 96.82 तर डिझेलचे दर 87.81 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. विशेष म्हणजे जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या दरात 5 टक्क्यांपेक्षा जास्तची तेजी आलेली असताना इंधन दरात कपात केली आहे.

पश्मिच बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल व डिझेलचे दर क्रमशः 90.62 आणि 83.61 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर चेन्नई येथे इंधन दर क्रमशः 92.43 व 85.73 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तेल कंपन्यांनी तब्बल 16 वेळा इंधन दरात वाढ केली होती. त्यावेळी पेट्रोल दरात झालेली वाढ 4.74 रुपयांची होती तर डिझेल दरातील वाढ 4.52 रुपयांची होती. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याने देशभरात संतापाचे वातावरण होते. या दरवाढीनंतर गेल्या काही दिवसात इंधन दरात 3 वेळा कपात झाली आहे. या कपातीद्वारे पेट्रोल दरात 61 पैशांची तर डिझेल दरात 60 पैशांची कपात झाली आहे.