चार वर्षात पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा उच्चांक

मुंबई : वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आज देशभरात उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रति लीटरमागे पेट्रोलचे दर 81 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल प्रती लीटर 68 रुपयांवर पोहोचले आहे.
नागपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारने नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात.
पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात नऊ रुपये तर डिझेलच्या दरात सात रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने आता विरोधकांकडून सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.