पोलिसनामा ऑनलाईन : Petrol Pump Will Stop UPI Payment | सायबर फसवणुकीमुळे महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपावर युपीआय व कार्ड पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी १० मे पासून युपीआय आणि इतर डिजिटल पेमेंट स्वीकारणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील अनेक भागात, विशेषतः विदर्भ व नाशिकमध्ये लागू होणार आहे. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन आणि नाशिक पेट्रोल पंप डीलर्स संघटनेने याबाबत पुढाकार घेतला आहे.
नाशिक संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी सांगितले की, अनेक पंप चालकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक वेळा फसवणूक करणारे लोकं इतरांचे कार्ड किंवा नेटबँकिंग वापरून पेमेंट करतात आणि नंतर तक्रार करून तो व्यवहार रद्द करून घेतात. त्यामुळे पंप चालकांचे हजारो रुपयांचे नुकसान होते.
फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, ” याबाबत सरकारला माहिती देण्यात आली आहे. जोपर्यंत सायबर फ्रॉडविरोधात कडक उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत डिजिटल पेमेंट पुन्हा सुरु केले जाणार नाही. “