Coronavirus : ‘पेट्रोल’ विक्रीला ‘बंदी’ असताना पुण्यात पंप सुरु, पोलिसांकडून पेट्रोल पंप ‘सील’

हिंजवडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. कोरोना विषाणूचा पसार रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल डिझेलची विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. असे असतानाही हिंजवडी-माण रोड वरील पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्री करण्यात आली. या पंपावर पोलिसांनी कारवाई करून पेट्रोल पंप सील केला आहे.

हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई आज (शुक्रवार) दुपारी अडीचच्या सुमारास गायत्री पेट्रोल पंपावर केली. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी धमेंद्र हिडनारायण दुबे (रा. दुबे बिल्डिंग, कामगार नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक कुणाल दिलीप शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल व डिझेल देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून धमेंद्र हिडनारायण यांनी हिंजवडी-माण रस्त्यावरील गायत्री पेट्रोल पंप आज सुरु केला. या ठिकाणी पेट्रोल विक्री करण्यात आली. पेट्रोल खरेदीसाठी पंपावर 30 ते 40 दुचाकी आल्याने गर्दी झाली होती. हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून पेट्रोल पंप सील केला असून धमेंद्र हिडनारयण याच्यावर राष्ट्रीय व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.