10 दिवसात पेट्रोलमध्ये लिटरमागे 1.88 रुपयांची वाढ !

पुणे : पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर सुरु झालेली पेट्रोल व डिझेलमधील भाव दिवसेंदिवस चढत्या क्रमाने सुरुच आहे. गेल्या १० दिवसात पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे तब्बल १.८८ रुपयांची वाढ झाली आहे.

पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे २७ पैशांनी वाढ झाली आहे. आज पुण्यात पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९८.३३ रुपये असणार आहे. डिझेलच्या दरातही आज ३५ पैशांनी वाढ झाली आहे. आता डिझेलची किंमत ८८.४३ रुपये प्रति लिटर असणार आहे. पॉवर पेट्रोलमध्ये आज २८ पैशांनी वाढ झाली आहे. आता पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर १०२.०२ रुपये असणार आहे.

पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर ४ मेपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. ३ मे रोजी रात्री पेट्रोलचा दर ९६.४५ रुपये प्रति लिटर होता. तो आता ९८.३३ रुपये झाला आहे. १० दिवसात पेट्रोलच्या दरात १.८८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी डिझेलचे दर ८६.११ रुपये लिटर होते. १० दिवसात डिझेलच्या दरात तब्बल २.३२ रुपयांची वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलमध्ये १.९९ रुपयांची दरवाढ झाली आहे़.