पेट्रोल, डिझेलच्या किंमतीतील दरवाढ थांबता थांबेना

पुणे : पाच राज्यातील निवडणुकांनंतर तेल कंपन्यांनी सुरु केलेली पेट्रोल डिझेलवरील दरवाढ थांबायचे नाव घेईना. ४ मेपासून सुरु झालेली ही दरवाढ अजूनही दररोज सुरु असून पेट्रोलमध्ये साधारण २२ ते २४ पैसे आणि डिझेलमध्ये ३२ ते ३४ पैशांची लिटरमागे वाढ होताना दिसत आहे. ही भाववाढ अशीच सुरु राहिल्यास डिझेलचे दर पेट्रोलच्या बरोबर येण्याची शक्यता आहे.

बुधवारी पेट्रोलमध्ये प्रतिलिटर २४ पैशांनी वाढ झाली आहे. आज पुणे शहरातील पेट्रोलचा दर ९८.०६ रुपये झाला आहे. डिझेल आज २६ पैसे प्रतिलिटर महागले आहे. आज डिझेलचा दर प्रतिलिटर ८८.०८ रुपये झाला आहे. त्याचवेळी पॉवर पेट्रोलमध्ये २४ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता १०१.७४ रुपये लिटर झाला आहे.