पुण्यात पुन्हा पेट्रोलची विक्री सुरू, सर्वसामान्यांना मिळणार का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथिल केले असल्याने सर्वसामान्य नागरिकांना देखील आता पेट्रोल मिळणार असल्याची चर्चा होती. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल -डिझेल मिळण्याबाबत सुरु असलेल्या गोंधळात जिल्हाधिकारी यांनी बुधवारी नवीन आदेश काढले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी नव्याने काढलेल्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागात नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतेही ओळखपत्र किंवा पासची गरज लागणार नाही. सोमवारी (दि.4) महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी इतर काही दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पेट्रोल पंपाबाबत कोणतेही स्पष्ट आदेश दिले नव्हते. त्यामुळे शहरात गेले तीन दिवस गोंधळाची परिस्थिती होती.

त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह पुणे पेट्रोल डिलर असोसिएशन अध्यक्ष समीर लडकत व उपाध्यक्ष सागर रुकारी यांची बैठक झाली. त्यामध्ये पंपावर रिक्षा आणि कॅब वगळता सर्वसामान्य नागरिकांनाही पेट्रोल देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, मंगळवारी रात्री पुन्हा या निर्णयात बदल करत, सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु बुधवारी (दि.6) दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नवीन परिपत्रक जाहीर करत पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व ठिकाणच्या पेट्रोल पंप चालकांनी सर्वसामान्य नागरिकांना पास किंवा ओळखपत्राची मागणी न करता इंधन द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पेट्रोल-डिझेलची विक्री होणार आहे. तर राष्ट्रीय महामार्गावरील पंप शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील, असे स्पष्ट केले आहे.