Corona Vaccine : कोरोनावरील ‘ही’ लस 6 महिने प्रभावी असल्याचा दावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लसीकरण मोहीम सुरु केली आहे. यात अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये फायजर-बायोएनटेकच्या लशीचा वापर सुरू आहे. या लशीचे दोन डोस घेतल्यानंतर 6 महिने लशीचा प्रभाव कायम राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. लस घेतल्यानंतर किती दिवस लस प्रभावी ठरेल असा प्रश्न उपस्थित केला होता. फायजर-बायोएनटेकने दिलेल्या माहितीच्या आधारे एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

फायजर-बायोएनटेकच्या लस चाचणीत ही बाब समोर आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत कोरोनाची बाधा असलेल्या 927 जणांचे विश्लेषण केले होते. फायजर-बायोएनटेक लस बीएनटी 162 बी-2 विरोधात 91.3 टक्के प्रभावी आढळली. दुसऱ्या डोसनंतर 7 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंत लस प्रभावी असल्याचे समोर आले. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाद्वारे कोरोनाबाबत सांगितलेल्या गंभीरतेबाबत ही लस 95.3 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत लसीकरण झालेल्या 12 हजारांहून अधिक स्वयंसेवकांचा डेटा एकत्र केला होता. दुसरा डोस दिल्यानंतर फॉओअपसाठी कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी होता. फायजरचे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट मोरला आणि बायोएनटेकचे सीईओ आणि सह-संस्थापक युगुर साहिन यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा डेटा आम्ही विकसित केलेल्या लशीचा प्रभावीपणा आणि सुरक्षितेची पुष्टी करते. ही लस सध्या समोर येत असलेल्या कोरोनाच्या वेगवेगळ्या वेरिएंटवरही प्रभावी असल्याचे म्हटले आहे.