COVID-19 : ऑगस्टमध्ये शिगेला पोहचेल ‘कोरोना’, 58 % भारतीय होऊ शकतात ‘प्रभावित’, अमरिंदर सिंहांनी सांगितलं

पंजाब :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसमुळे पंजाबची परिस्थितीही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, जुलै-ऑगस्टपर्यंत हा साथीचा रोग भारतात शिगेला पोचेल, असा अंदाज वैज्ञानिक आणि वैद्यकीय विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच देशातील सुमारे ५८% भारतीयांना याचा संसर्ग होईल असा अंदाज आहे. तर पंजाबमधील जवळपास ८७% लोकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमरिंदर सिंह यांनी शुक्रवारी राज्यात लॉकडाउन कालावधी वाढवण्याचे संकेत देत ते हटवण्याची ही योग्य वेळ नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोरोनाविरूद्ध केंद्राने राज्यांसाठी १५,००० हजार कोटी रुपयांचे पॅकेज अपुरे आहे आणि अशात मोदी सरकारने राज्य सरकारांना पुरेशी आर्थिक मदत पुरविली पाहिजे.

लोकांपर्यंत आवश्यक वस्तू पोचवण्याची व्यवस्था : अमरिंदर सिंह

अमरिंदर सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांना सांगितले की, ‘आम्ही आधी लॉकडाउन केले आणि नंतर कर्फ्यू लावला. त्यानंतर आवश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. आमचे लोक प्रत्येक भागात पोहोचले आहेत आणि आवश्यक वस्तू पुरवत आहेत.’

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची प्रकरणे सुरु झाल्यानंतर दीड लाख लोकं परदेशातून पंजाबला आले. आम्ही तपासणी केली आणि लोकांना आयसोलेशन मध्ये ठेवले. आता अधिक लोकं आयसोलेशन मधून बाहेर आले आहेत.

ते म्हणाले, ‘सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. १३२ प्रकरणात संक्रमणाची पुष्टी झाली असून ११ लोक मरण पावले आहेत. एकूण २८७७ लोकांची तपासणी झाली आहे.’ राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत देत सिंह म्हणाले की, त्यांचे सरकार निर्बंध वाढवण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहेत, कारण ते हटवण्याची ही योग्य वेळ नाही. ते म्हणाले कि मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल.

कोरोनाबाबत समिती गठीत : सिंह

अमरिंदर सिंह म्हणाले की, लॉकडाउन अनिश्चित काळासाठी करता येणार नाही, अशा परिस्थितीत सरकार कामकाज सुरू करण्याचा मार्ग शोधत आहे. ते म्हणाले की, कोरोना व्हायरस संकटाबाबत रणनीती तयार करण्यासाठी एक सशक्त समिती गठित केली गेली आहे आणि त्या अहवालाच्या आधारे निर्णय घेण्यात येईल.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आम्ही चार टप्प्यात तयारी करत आहोत. पहिल्या टप्प्यात दोन हजार बेड व उपकरणे, दुसऱ्या टप्प्यात १० हजार बेड व उपकरणे, तिसऱ्या टप्प्यात ३० हजार बेड व उपकरणे, चौथ्या टप्प्यात एक लाख बेड व उपकरणे अशी व्यवस्था असेल.

परिस्थिती भयावह होऊ शकते : सिंह

त्यांनी काही तज्ञांचा हवाला देत असे सांगितले की, ही परिस्थिती भयावह होऊ शकते आणि त्यासाठी तयार राहावे लागेल. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार पीजीआय चंदीगडच्या तज्ञांचा अंदाज आहे की, सप्टेंबरच्या मध्यात भारतात कोरोना विषाणू शिगेला जाईल आणि देशातील ५८ टक्के लोकसंख्येवर याचा परिणाम होईल.