Coronavirus : ‘कोविड’ वॅक्सीनसाठी पहिल्या टप्प्यात 375 निरोगी लोकांवर होणार परीक्षण, AIIMS च्या संचालकांनी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जगभर कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यात काही प्रमाणात यशही येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ असेल अथवा रशिया हे लस शोधल्याचा दावा करत आहेत. पण अजून यामध्ये अजून कोणालाही संपूर्णपणे यश आले नाही. इकडे भारतात ICMR(Indian Council of Medical Research) आणि AIIMS(All India India Institute of Medical Science) चे देखील शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी, आपण दोन लसी निर्माण केल्या आहेत ज्या आता मानवी चाचणीसाठी(Human Trial) टप्प्यात आल्या आहेत असं सांगितलं आहे.

ही लस दिल्यावर रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. याचा प्रभाव म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती 1 ते 2 वर्ष चांगली राहील, असा दावाही डॉ. गुलेरिया यांनी केला आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, या लसीची टेस्ट 18-55 या वयोगटातील स्वस्थ आणि कोणत्याही आजाराने त्रस्त नसणाऱ्या व्यक्तींवर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 375 नमुने घेऊन त्याचा अभ्यास केल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यातील टेस्ट 12-65 वयोगटातील 750 लोकांवर केला जाईल.

वरील टेस्ट यशस्वी झाल्यावर त्याचा वापर जे लोकांची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे त्यांना दिली जाईल. तसेच ज्यांना दररोज स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करावं लागतंय अशा आरोग्यसेवकांना देखील ही लस देण्यात येईल.

भारतात मृत्युदर कमी:

डॉ. गुलेरिया पुढे बोलताना म्हणाले की, दक्षिण आशियाई देश अथवा अमेरिका, इटली किंवा स्पेनशी तुलना केली असता भारताचा कोरोनाच्या रुग्णांचा मृत्युदर कमी आहे. काही राज्यात आपण उच्चांक गाठला असून आता तिथं रुग्णांचा दर कमी होताना दिसत आहे उदा. दिल्ली . काही राज्यांचा दर अजून वाढताच आहे.