शासकीय रूग्णालयातून चुकीचा कॉल अन् सर्वांची तारांबळ

यवतमाळ, ता. २ : पोलीसनामा ऑनलाइन : कोरोना रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांवरही येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहे. कोरोना वाॅर्डातील मृत्यू व प्रकृतीबाबत नातेवाइकांना फोन करून सांगितले जाते. दरम्यान, असाच एक फोन दिघी येथील देवेंद्र कावलकर यांना आला. त्यांना वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्री हा फोन आला. त्यामुळे कावलकर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडिलांच्या दु:खद वार्तेने ते थेट शासकीय रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांना वडील ठणठणीत असल्याचे दिसले.

ज्ञानेश्वर कावलकर यांना काही दिवसांपासून खोकला व ताप याचा त्रास असल्याने मंगळवारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांना वाॅर्ड क्र.१९ मध्ये ठेवले होते. नंतर वाॅर्ड क्र.२५ मध्ये हलविण्यात आले. दवाखान्यातून देवेंद्र कावलकर यांना फोन आला की, त्यांच्या वडिलांची प्रकृती गंभीर होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा संदेश ऐकून कावलकर कुटुंबीय दु:खाच्या शोकसागरात बुडाले. नातेवाइकांना निधनाचा निरोप देण्यात आला. घरात रडारड सुरू झाली. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने शोक व्यक्त करू लागला. धीर धरत देवेंद्र कावलकर यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठले. ते थेट वाॅर्ड क्र.२५ मध्ये पोहोचले. तेथे त्यांचा स्वत:च्या डोळ्यांवर काही क्षण विश्वास बसला नाही. त्यांचे वडील ज्ञानेश्वर कावलकर हे ठणठणीत अवस्थेत पलंगावर बसले होते. चाैकशी केली असता त्या वाॅर्डातील संबंधित डाॅक्टरने गयावया करत चूक झाल्याचे सांगितले.

हा प्रकार अतिशय गंभीर असून याची चाैकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र कावलकर यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या निधनाचा निरोप दिला, त्या ज्ञानेश्वर कावलकर यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला होता. प्रकृतीही ठणठणीत होती. त्यानंतरही निधनाचा फोन करण्यात आला.