काँग्रेस-शिवसेनेत सर्वकाही अलबेल ? राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फोनवर चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गाचे संकट वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीतील मित्र पक्षाची बैठक बोलवली आहे. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना या संकट काळात काँग्रेस महाविकास आघाडी सोबतच असल्याचं सांगितलं. काल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रातील सरकारमध्ये काँग्रेस पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहे, निर्णय घेण्याच्या भूमिकेत नाही. सरकार चालविणे आणि पाठिंबा देणे यात फरक आहे” त्यांच्या या विधानानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच आलबेल नसल्याचं दिसलं.

मात्र, मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या सोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच असल्याचं आश्वासन दिलं. तर मंगळवारी राज्यात झालेल्या घडामोडीनंतर तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्याचदिवशी शरद पवार मातोश्रीवर जात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीमध्ये राज्यातील कोरोना संदर्भांत स्थिती बाबत चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं असलं तरी, ते सतत राज्य सरकार स्थिर असल्याचं बोलत आहेत.

आजच्या सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे की, शरद पवार आणि संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेत कोरोना संसर्गाविरुद्ध सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शरद पवारांनी अनेकदा मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या बैठका नियमित होत असतात. भाजपाने महाराष्ट्र ऐवजी गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी, उद्धव ठाकरे सरकार ११ दिवस चालणार नाही असं म्हणले होते. पण आज जवळपास ६ महिने ठाकरे सरकारला पूर्ण झालेत असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते देत असले तरी हे सरकार अंतर्विरोधाने पडेल असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.