Coronavirus : तुमच्या ‘स्मार्टफोन’च्या स्क्रीनवर देखील असू शकतो ‘कोरोना’ विषाणू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे भारतात आतापर्यंत १५ पर्यटकांसहित १८ लोकांना संक्रमण झाले आहे. तसेच चीन, इराण, दक्षिण कोरिया मध्ये या विषाणूचे अनेक लोकांना संक्रमण झाले आहे. त्याचवेळी वैद्यकीय शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की कोणकोणत्या ठिकाणांवरून कोरोना विषाणू लोकांमध्ये पसरू शकतो.

एका अहवालानुसार, इंग्लडचे साउथॅम्प्टन विद्यापीठाचे प्रोफेसर विल्यम केविल यांनी सांगितले आहे की, जर आपण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्पर्श करत असाल तर आपल्या चेहऱ्याला हात लावण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर देखील कोरोना विषाणू असू शकतो.

वैद्यकीय शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणू सुमारे एक आठवड्यापर्यंत निर्जीव पृष्ठभागावर जिवंत राहू शकतो. तथापि, हा विषाणू कफ किंवा मानवी शरीरातून शिंकांच्या स्वरूपात बाहेर येत असतो. विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका हा संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्कात आल्यानं होतो.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या डायरेक्टरनी सांगितले आहे की, कोरोना विषाणू तांबे आणि स्टीलच्या पृष्ठभागावर जवळपास २ तासांपर्यंत राहू शकतो. तर कार्डबोर्ड आणि प्लास्टिकवर हा विषाणू बराच काळ जिवंत राहू शकतो. तसेच जर्नल ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शनने २२ अभ्यासांच्या विश्लेषणाच्या आधारावर म्हटले आहे की कोरोना विषाणू मानवी शरीराबाहेर ९ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.

तज्ञांचे म्हणणे आहे की, अल्कोहल वाइप्स ने स्मार्टफोनला स्वच्छ करून विषाणूचा खात्मा करता येऊ शकतो. त्याचवेळी, विषाणू पासून बचाव करण्यासाठी लोकांना सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ९२००० पेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. तर जगभरात ३११० लोकांचा मृत्यू झाला असून एकट्या चीनमध्ये ही संख्या २९०० इतकी आहे.