IPS रश्मी शुक्ला यांनी CBI चौकशीत अनेक गोप्यस्फोट केल्याचा भाजप नेत्याचा दावा, म्हणाले – ‘चौकशी करण्यापुर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांनी CBI समोर झालेल्या चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले असून, त्यांनी दोन अनिल, त्यांचे निकटवर्तीय आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी रश्मी शुक्ला यांच्या चौकशीबाबत एक सनसनाटी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

आमदार भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये झालेल्या सीबीआय चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतले आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.

दरम्यान, अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत सापडेली स्फोटकं, त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या या दोन्ही प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांचा आढळलेला सहभाग. त्यानंतर परमबीर सिंगांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुखांवर केलेला आरोप आणि त्यानंतर बदल्यांच्या रॅकेटबाबतच्या संभाषणाचा 6.1 जीबी डेटा आपल्याकडे असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले होते. दरम्यान, फडणवीसांनी केलेल्या दाव्यानंतर रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. त्या प्रकरणात शुक्लांनी अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी केला होता. तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान या प्रकरणात सीताराम कुंटे यांनी दिलेल्या अहवालात नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्यावर काही जणांचे फोन टॅप करण्याची परवानगी शुक्लांनी घेतली होती असे म्हटले होते.