Coronavirus Care Policy : फक्त 156 रूपयांमध्ये मिळतेय 50 हजार रूपयांचं विमा संरक्षण, जाणून घ्या कसं मिळवाल पॉलिसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूमुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांचा कामधंदा बंद झाला आहे. आर्थिक व्यवहार थांबले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वात मोठे संकट रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांवर आले आहे. कोरोनावरील उपचारासाठी सरकारकडून मदत केली जात आहे. या रोगावर अद्याप कोणतेही औषध तयार झालेले नाही. अशा संकटाच्या परिस्थितीत विमा पॉलिसीची चांगली मदत मिळू शकते. डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या फोन पे ने कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी विमा पॉलिसी बुधवार (दि.1) पासून सुरु करण्याची घोषणा केली आहे.

फोन पे ने घोषणा केलेल्या विमा पॉलिसीचे नाव ‘कोरोना केअर’ असे आहे. या पॉलिसीचा प्रिमियम फक्त 156 रुपये असून 55 वर्षाखालील व्यक्तींसाठी 50 हजार रुपयाचे विमा संरक्षण देण्यात येत आहे. कोरोनाचा उपचार कोणत्याही रुग्णालयात सुरु असला तरी याचा फायदा ग्राहकाला मिळणार आहे. या शिवाय पॉलिसीमध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा 30 दिवसांचा खर्च आणि त्यानंतरच्या औषध उपचारांचा खर्च विमा धारकाला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही पॉलिसी घेण्यासाठी कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्याची गरज नही तसेच ही पॉलिसी ग्राहकाला त्याच्या घरी जाऊन दिली जाते.
पॉलिसीबाबत फोन पे च्या वतीने सांगण्यात आले आहे की, ही पॉलिसीची प्रक्रिया करण्यासाठी केवळ दोन मिनिटाचा अवधी लागतो आणि पॉलिसीची कागदपत्र ग्राहकांना अ‍ॅपवर तात्काळ दिली जाणार आहेत.

देशात आतापर्यंत या जिवघेण्या विषाणूची 1397 जणांना लागण झाली आहे. तर 123 लोक रोगापासून बरे झाले आहेत किंवा त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांमध्ये 49 परदेशी नागरिकांचा समावेश असून 35 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा आता तिसरा टप्पा सुरु झाल्याचे दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात बुधवारी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.