देवेंद्र फडणवीस पुन्हा आले अन् विधिमंडळाच्या कॅलेंडरवर CM झाले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या काळात फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’ ही कविता सादर करत आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. नंतर फडणवीसांची ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा प्रचंड गाजली. परंतु फडणवीसांना मुख्यमंत्री काही होता आलं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी मिळून सत्ता स्थापन करत फडणवीसांच्या पुन्हा येईनच्या संकल्पनेवर पाणी सोडले. मात्र असं असलं तरी विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मात्र देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसत आहे. या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीनं सरकार स्थापन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली आणि नंतर जानेवारीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार देखील करण्यात आला. मात्र अजूनही विधिमंडळाच्या कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. तसेच राज्यपाल म्हणून सी. विद्यासागर राव यांचा फोटो आहे. त्यामुळे हे कॅलेंडर नेमकं छापलं कधी आणि इतकी गंभीर चूक केली कोणी, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. कारण सरकार स्थापन होऊन इतके दिवस झाले तरी साधा फोटो देखील बदलला जात नाही याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

या कॅलेंडरवर फक्त देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे असे नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांचादेखील फोटो छापण्यात आला आहे आणि त्यांच्या फोटोखाली विरोधी पक्षनेते, विधानसभा असं पद देखील लावण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त अन्य फोटो असून त्यात धनंजय मुंडे (विरोधी पक्षनेते, विधान परिषद), हरिभाऊ बागडे (विधानसभा अध्यक्ष), रामराजे निंबाळकर, (सभापती, विधान परिषद) यांचे देखील फोटो आहेत. त्यामुळे सत्ताबदल होऊनदेखील त्यात सुधारणा झाल्या नाहीत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले काही लोकांना वाटत होते की राज्यात आपलीच सत्ता येईल, परंतु तसे न झाल्याने हे फोटो छापण्यात आले आहेत असं जयंत पाटील म्हणाले. तसेच ते म्हणाले की ज्या अधिकाऱ्यांकडून ही चूक झाली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून कॅलेंडर छपाईचा खर्च देखील वसूल केला जाणार आहे. असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा –