‘खाकी’चे ‘खादी’मध्ये झाले ‘परिवर्तन’ ; पोलीस निरीक्षक झाले खासदार, सहकाऱ्यांना पहाताच ठोकला ‘सॅल्यूट’

हैदराबाद : वृत्तसंस्था – पोलिसांना नेहमीच खासदार, मंत्री यांना सलाम करताना आपण पाहिले असेल. मात्र, सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये खासदार पोलिसांना सलाम करताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल की असे केसे झाले. कारण एखाद्या पोलिसाने सलाम नाही केला तर मंत्री अथवा खासदारांचा ईगो दुखावला जातो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोची रंजक कहाणी आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो आंध्र प्रदेशातील आहे. आंध्र प्रदेशीतील अनंतपूरमधील कादिरीचे सर्कल निरीक्षक गोरंतला माधव यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती. माधव यांनी हिंदूरपूमधून वायएसआर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत माधव यांनी विद्यमान खासदाराचा तब्बल १ लाख ४० हजार ७४८ मतांनी पराभव केला.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माधव यांची भेट गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक मेहबूब बाशा यांच्याशी झाली. माधव हे पोलीस दलात कार्यरत अताना बाशा हे त्यांचे वरिष्ठ अधिकारी होती. मेहबूब बाशा अचानक समोर येताच माधव यांनी बाशा यांना सलाम ठोकला. माधव यांनी आपण खासदार आहोत हे विसरून आपल्या जुन्या वरिष्ठांना सलाम ठोकला. हाच फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उचलून धरत माधव यांच्यावर टीका केली. तर काहींनी त्यांचे कौतुक केले. यावर भाष्य करताना माधव म्हणाले, मतमोजणी केंद्रावर तैनात असलेले माझे जुने वरिष्ठ अधिकारी मला दिसले. त्यामुळे मी त्यांना सलाम ठोकला. मी खासदार झाल्यानंतर त्यांनी मला सलाम केला. आम्ही एकमेकांचा आदर करत एकमेकांना सलाम केला असल्याचे माधव यांनी सांगितले.