‘तो’ फोटो व्हायरल झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. राज्यपाल आणि सरकारचे संबंध गोड आहे. राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी दिली. मात्र, या भेटीतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून आता व्हायरल होत असलेल्या फोटोबाबात संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.

राज्यपालांची भेट घेताना संजय राऊत यांनी राजभवनात दाखल झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाकून नमस्कार केला. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ट्विटरवरून राज्यपालांवर मोठी आगपाखड केली होती. त्यामुळे कोपरापासून दंडवत घालणाऱ्या संजय राऊत यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर बघता बघता प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर संजय राऊत यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
भगतसिंग कोश्यारी हे माझ्यपेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून हा नमस्कार केला. अन्यथा आमच्यात चांगला संवाद झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं महाविकास आघाडी सरकार सुरळीतपणे सुरु आहे, असं मी त्यांना सांगितलं, असं स्पष्टिकरण देत राऊत यांनी तो व्हायरल फोटो ट्विट केला आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या फोटोवरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. धडकने लगा दिल, नजर झुक गई, कभी उन से जब ‘सामना’ हो गया, असे ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलं आहे.

राज्याचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात शासकीय निर्णय घेण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच खासदार संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटलीला पोहचले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी राजभवनावर जाऊन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. संजय राऊत आणि राज्यपाल यांच्यात 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यपालांची भेट घेऊन ते राजभवनातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, राज्यपालांसोबत ही सदिच्छा भेट होती. खूप दिवसांपासून भेट घेण्याचं नियोजन होतं. पण, त्यांची काही भेट होऊ शकली नाही. त्यांचे आणि माझे जुने संबंध आहेत. देशात काही घटना घडल्यात त्या संदर्भात मी नेहमी लिखाण करत असतो. त्यामुळे मी फक्त राज्यपालांसाठी लिहिलं असं काहीही नव्हतं, असे राऊत म्हणाले.

You might also like