उदयनराजेंच्या टीकेमुळे शिवसेना भवनचा ‘तो’ फोटो पुन्हा आला चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करण्यात आल्याने देशात आणि महाराष्ट्रात वादंग उठले. आज (मंगळवार) छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपले परखड मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेना भवनावर लावण्यात आलेला फोटो दाखवून शिवसेनेवर शिरसंधान साधले. त्यामुळे शिवसेना भवनावर लावण्यात आलेला फोटो चर्चेत आला आहे.

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला निशाणा बनवले आहे. त्यांनी महाराजांच्या मूर्तीला शिवसेना भवनावर दिलेल्या स्थानकावरून सवाल उपस्थित केला आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा धागा पकडून त्यांनी चारीबाजूने टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाला देखील त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महाविकास आघाडीला देखील टार्गेट केले आहे.

संजय राऊत यांनी संभाजी राजे आणि शिवेंद्रराजे यांच्यावर केलेल्या टीकेला दोघांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर उदयनराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे यांनी शिवसेना भवनाचा शिवाजी महाराजांचा पेहराव केलेला व्यक्ती राष्ट्रवादीच्या नेत्याला मुजरा करतानाचा फोटो दाखवला.

दरम्यान, शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्या खालील बाजूस शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे. हा महाराजांचा एक प्रकारे अपमान असल्याचा रोख उदयनराजे भोसले यांचा होता. याचा राग मराठा संघटनांमध्ये देखील आहे. आता उदयनराजे यांनीच ही बाब समोर आणल्याने शिवसेना भवनावरील बाळासाहेबांचा फोटो आणि शिवाजी महाराजांची मूर्ती चर्चेत आली आहे. आता यावर शिवसेना काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –

You might also like