तब्बल अडीच महिन्यांनी खूनाच्या गुन्ह्याची उकल, 2 अल्पवयीन मुलांनी केला छायाचित्रकाराचा खून

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन –  तब्बल अडीच महिन्यांनी शहरातील छायाचित्रकार केदार भागवत (वय 46, रा. शालीमार चौक, दौंड) यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व दौंड पोलीसांना यश आले आहे. दोन अल्पवयीन मुलांनी लिफ्ट देत लूटण्याच्या बहाण्याने त्यांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

भागवत यांचा 4 ऑक्टोंबर रोजी दौंड – लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथे दगड घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी गेल्या अडीच महिन्यांपासून पोलीसांनी तपास सुरु केला होता. कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते. दरम्यान 5 डिसेंबर रोजी दौंड – कुरकुंभ रस्त्यावर एका खासगी कंपनीतील विक्री अधिकारी असणा-या संजय मिश्रीलाल मुनोत यांना लुटल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने तीघांना आणि लुटीचा माल घेणा-या एकाला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्यापैकी दोघांनी आपणच केदार भागवत यांचा खून केल्याचे कबूल केले.

4 ऑक्टोंबर रोजी आरोपीनी भागवत यांना लिप्ट दिली होती. दुचाकीवर गप्पा मारत तिघे काळेमळा येथे आल्यानंतर आरोपीनी भागवत यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतू भागवत यांच्या खिशात केवळ 20 रुपये निघाल्याने आरोपीनी त्यांच्या डोक्यात दगड घालून निर्घूणपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.