छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर यांचे निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन
ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर यांचे  कोल्हापूरात शुक्रवारी सकाळी निवासस्थानी कमी रक्तदाबाच्या आजाराने  निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता , मुलगा महेश, मुलगी तेजस्विनी, सून अनघा आणि नातवंडे असा परिवार आहे.
मराठी चित्रसृष्टीत अधिराज्य गाजवलेल्या पेंढारकर परिवारातील  छायाचित्रकार तथा स्व. भालजी पेंढारकर यांचे  ते पुतणे तथा बाबूराव पेंढारकर यांचे पुत्र होते. घरातूनच कलेचा वारसा लाभलेल्या त्यागराज यांनी इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्ही. जे. टी. आय. इंजिनिअरिंगची परीक्षाही त्यांनी दिली. पण दोनदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून लागलेला छायाचित्रणाचा छंद जोपासण्यासाठी भालजींच्या स्टुडिओत कॅमेरा विभागामध्ये ते दाखल झाले.
मुंबईत आल्यावर ते राजकमल स्टुडिओसाठी काम करु लागले. सहाय्यक कॅमेरामन व मग मुख्य कॅमेरामन म्हणून त्यांनी छाप पाडली. मराठी, हिंदीसह गुजरात व मद्रासी सिनेसृष्टीतही त्यांनी काम केले. दो आँखें बारह हाथ, राजकमल, नवरंग, श्री ४२० अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. मराठीत त्यांनी यशोदा, आंधळा मारतो डोळा, देवा शपथ खर सांगेन या चित्रपटांसाठी काम केले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी हा पुरस्कार, एस. एन फिल्म सोसायटीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, व्ही शांताराम व दादासाहेब फाळके तांत्रिक क्षेत्रातील पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
 त्यागराज यांचे ‘पडद्यामागचा माणूस ‘ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.
पेंढारकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार असून चित्रपटांचा चालता बोलता इतिहास हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे