शासकीय आणि खासगी वृक्षतोडीचे छायाचित्रण अनिवार्य
पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन
शहरात वृक्षतोड करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी खाजगी बांधकाम संदर्भात वृक्षतोड करण्यात येणाऱ्या वृक्षांची छायाचित्रण करणे गरजेचे झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, सरकारी आणि शासकीय संस्था व कार्यालयांना वृक्षतोड करण्यासाठी आता छायाचित्रण करणे आता बंधनकारक केले आहे. छायाचित्रे नसल्याने पालिकेच्या स्थापत्य, बीआरटीएस आणि पुणे मेट्रोचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने फेटाळला आहे.
या समितीची मंगळवारी बैठक झाली. या वेळी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सदस्य विलास मडिगेरी, शीतल शिंदे, श्याम लांडे, संभाजी बारणे, सदस्या साधना मळेकर, डॉ. वैशाली घोडेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, एन. डी. गायकवाड, डी. एन. गायकवाड उपस्थित होते.
खासगी बांधकामांसाठी अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्याच्या परवानगी अर्जासोबत संबंधित झाडाचे छायाचित्रे जोडणे सक्तीचे केले आहे. मात्र, पालिकेचे विभाग तसेच, सहकारी व शासकीय संस्था व कार्यालये सदर अर्जासोबत झाडांचे छायाचित्रे सादर करीत नाहीत. त्यामुळे समितीने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता विभागाने 6 झाडे, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या उपअभियंता विभागाने 24 झाडे व कार्यकारी अभियंता विभागाने 178 झाडे कापण्यासाठी अर्ज केला होता.
चिंचवड- काळेवाडी पुल ते भाटनगर एसटीपी प्लॅन्टपर्यंतचा रस्त्याचे 18 मीटर रूंदीकरणासाठीव 178 झाडे तोडण्यात येणार आहे. तसेच, पुणे मेट्रोच्या कामासाठी मोरवाडीतील मॉलसमोरील पाच झाडे तोडणे तसेच, 24 झाडांचे पुनर्रोपणाचा अर्ज होता. या सर्वांच्या अर्जासोबत छायाचित्र नसल्याने ते अर्ज फेटाळण्यात आले आहेत. या पुढे त्यांना छायाचित्रासह अर्ज भरण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.