एकच कारण ‘राज’कारण ! एकाच बॅनरवर PM मोदी आणि राज ठाकरे, सुरु होणार मैत्रीचा नवा अध्याय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवेसना युती तुटल्यानंतर आता राज्यात अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत. विविध जिल्ह्यात स्थानिक पातळीवर आता वेगवेगळी राजकीय गणित जुळताना दिसत आहे. याचाच प्रत्यय आज पालघरमध्ये दिसून आला. पालघरच्या वाडा पंचायत समितीच्या निवडणूकीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे एकाच बॅनरवर फोटो झळकले. यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 7 जानेवारीला याठिकाणी मतदान होणार आहे. वाडा पंचायत निवडणूकीच्या भाजप उमेदवारंना लावलेल्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे राज्यात मनसेची भाजपशी जवळीक वाढणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात भाजपशी फिसकटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आपली सत्तेची चूल मांडली. आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आहेत. स्थानिक पातळीवर देखील महाविकासआघाडीने बऱ्याच जिल्हा परिषदेत यश मिळवले आणि भाजपला सत्तेपासून दूर ठकलले. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिकेचे महापौर निवडणूकीत स्थानिक आघाड्या स्थापन झाल्या, परंतु सर्व घडामोडी नाशिक महानगरपालिकेत मनसेने भाजपला मदत केली तर केडीएमसीच्या स्थायी समितीत सभापती निवडणूकीवेळी भाजप उमेदवाराला मनसेची साथ मिळाली.

यावरुन भाजप मनसेच जवळीक वाढत चालल्याची चर्चा सुरु झाली मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे 23 जानेवारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबईत 23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन होणार आहे त्यात मनसेची पुढील भूमिका स्पष्ट होईल.

असे असले तरी लोकसभा निवडणूकांदरम्यान आणि विधानसभा निवडणूकादरम्यान राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात तोफ डागली होती. मोदी – शाहांवर जोरदार टीका केली होती. परंतु राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखे पक्ष वर्षांनुवर्ष एकमेकांवर टीका करु देखील सत्तेत एकत्र आल्याने राजकारणात काहीही होऊ शकते हे स्पष्ट झाले. त्यामुळे मनसे – भाजपची जवळीक निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/