Updated News : पुण्यात मनोरुग्ण मुलाने केला गळ्यात कात्री खूपसून आईचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मनोरुग्ण मुलाने आईच्या डोळ्यात चाकू खुपसला होता. ठिक १ वर्षानंतर त्याने आईच्या गळ्यात कात्री खुपसून तिचा खून केला. त्यानंतर मुलगा पसार झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आईने प्रेमा पोटी मुलाविरोधात त्यावेळी तक्रार दिली नव्हती. तेव्हा तक्रार दिली असती तर हा अनर्थ टळला असता. ही घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे रविवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकिस आली.

सुमन विजय सावंत (वय ७५, रा. चिंचवड) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर भुपेंद्र विजय सावंत (वय. ४०) हा पसार झाला आहे.

सुमन सावंत या मुलगा भूपैंद्रसह वाल्हेकरवाडी येथे राहात होत्या. पाच महिन्यांपुर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. तर त्यांची एक मुलगी नाशिक येथे राहण्यास होती. भूपेंद्र हा मनोरुग्ण आहे. वर्षभरापुर्वी भूपेंद्रवर येरवडा मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. मार्च २०१८ च्या अखेरीस त्याला रुग्णालयातून आणण्यात आले होते. तेव्हा त्याचे आई वडील आणि तो असे तिघे तेथे राहात होते. भूपेंद्र घरी आला तेव्हा त्याचे घरात वारंवार वाद होत होते. दरम्यान त्यांच्या या वादामुळे नागरिकही सुरुवातीला त्यांच्याकडे लक्ष देत. परंतु रोजच वाद होत असल्याने शेजारी पाजारीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. त्यानंतर २८ एप्रिल २०१८ रोजी त्याचे वडील मुंबईला कामानिमित्त गेलेले असताना त्याने आईच्या डोळ्यात चाकूच खुपसला होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी सुमन यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांचे पती मुंबईहून आल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार द्यायची की नाही याचा निर्णय घेऊ असे सुमन यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली नाही.

सुमन सावंत या दररोज घराचे दार उघडतात. परंतु रविवारी दुपार उलटून गेली तरी त्यांनी दार उघडले नाही म्हणून शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा त्या रक्ताच्या थाऱोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहिले तेव्हा गळ्यात कात्री खुपसलेल्या अवस्थेत सुमन सावंत यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. मात्र भूपेंद्र य़ा घटनेनंतर पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.