बाल विवाहानंतरचे शारीरिक संबंध आता ‘अत्याचार’च, होणार शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणामध्ये बालविवाह रोखण्यासाठी सध्याचा कायदा आणखी कडक करण्यात आला आहे. बालविवाहानंतर आता संबंधित मुलगी आणि तिच्या नवऱ्यातील शारीरिक संबंधास दुष्कर्म म्हणून समजले जाईल आणि शिक्षेच्या गुन्ह्याच्या श्रेणीत मोडल्याबद्दल शिक्षा देखील करण्यात येईल. तसेच पोक्सो अ‍ॅक्ट आणि आयपीसी अंतर्गत मुलाविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. दरम्यान हरियाणामध्ये दररोज सरासरी एक बालविवाह घडत असतो. यावर अंकुश ठेवण्यासाठी हरियाणा सरकारने संबंधित कायद्यात बदल केले असल्याचे समजते.

सरकारने बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ च्या कलम तीनमध्ये सुधारणा केली असून मंगळवारी बाल विवाह निषेध कायदा हरियाणा दुरुस्ती विधेयक, २०२० हे विधानसभेत एकमताने मंजूर झाले. दुरुस्तीनंतर अस्तित्वात असलेला कायदा राजपत्रातील अधिसूचनेनंतरच राज्यात लागू होईल. हरियाणाच्या महिला व बालविकास राज्यमंत्री कमलेश ढांडा यांनी सदर दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडले. जे सभापतींनी आवाजी मतदानाने मंजूर केले. हरियाणा सरकारने कर्नाटक विधानसभेचा निर्णय आणि दुरुस्तीचा अवलंब केला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य विधिमंडळांना ते अवलंबण्याचा सल्ला दिला होता. कलम ३७५ नुसार पुरुष आणि त्याची पत्नी यांच्यात १५ ते १८ दरम्यान लैंगिक संबंध ठेवणे दुष्कर्म नाही. परंतु, पोक्सो कायद्याच्या कलम ६ च्या तरतुदीनुसार, हा एक गैरव्यवहार मानला जातो. म्हणूनच कलम-३७५ रद्द करण्यासाठी सरकारने बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ मध्ये दुरुस्ती केली.