WhatsApp ग्रुपवर वरिष्ठांना शिवीगाळ, पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस निरीक्षकला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वरिष्ठांना शिविगाळ आणि अवमानकार मेसेज करणं चांगलच महागात पडलं आहे. पोलीस निरीक्षकांनी स्वत:वर झालेल्या कारवाईच्या रागातून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आपल्या वरिष्ठांना आक्षेपार्ह भाषा वापरून आपला राग व्यक्त केला. ज्यामुळे या पोलीस निरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. अनुप डांगे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून ते गावदेवी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

काय आहे प्रकरण
दक्षिण मुंबईमधील ब्रीच कँडी या परिसरात असलेल्या डर्टी बन पबमध्ये भांडण सुरु असल्याचा कॉल पोलिसांना आला होता. हा प्रकार 23 नोव्हेंबर 2019 मध्ये घडला होता. त्यावेळी डांगे हे रात्रपीळीच्या ड्युटीवर कर्तव्य बजावत होते. डांगे आपल्या पथकासोबत घटनास्थळी पोहोचले आणि यासंदर्भात गुन्हा नोंद केला. मात्र, या गुन्ह्याची नोंद करताना डांगे यांनी त्या भांडणाचे वेळी उपस्थित नसलेल्या एका व्यक्तीचे नाव गुन्ह्यात नोंदवण्याचा आदेश दिला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर डांगे यांना दक्षिण प्रादेशिक विभागातील कंट्रोल रूममध्ये संलग्न करण्यात आले. डांगे हे बदली केल्यामुळे संतापले होते आणि वरिष्ठांचा राग मनात ठेवून होते.

गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा ‘गावदेवी ऑफिसर्स’ नावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये डांगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आक्षेपार्ह, अवमानकारक आणि चारित्र्याबाबत भाष्य करणारा मेसेज पाठवला. हा मेसेज ग्रुपच्या बाहेर पोहचला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहचलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डांगे यांना सेवेतून निलंबित केलं. शिस्तप्रिय दल असणाऱ्या मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत असं वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समजतय. तसेच यापुढे असा प्रकार पुन्हा होऊ नये याची देखील दक्षता घेण्यात येत आहे.