‘चॉईस’ पोस्टींगसाठी राजकीय ‘दबाव’, महासंचालकांचा २ पोलिस निरीक्षकांना ‘दणका’ ; थेट DG ऑफीसमधील ‘कंट्रोल’ रूममध्ये ‘बदली’, पोलिस दलात खळबळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड जिल्ह्यातील दोघा पोलीस निरीक्षकांची पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी थेट मुंबई येथील मुख्यालयात बदली केली आहे. या दोघांनी बदलीसाठी राजकीय दबाव आणल्याने स्वत: जयस्वाल यांनी त्यांची नियंत्रण कक्षात बदली केल्याचे सांगण्यात येत आहे.

हदगावचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर आणि गुन्हे शाखेतील निरीक्षक सुनील निकाळजे अशी या दोन पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेत प्रशांत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून हदगाव येथे दिलीप पाटील यांची बदली केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील पदासाठी हदगावचे रामराव गाडेकर आणि गुन्हे शाखेतीलच सुनील निकाळजे हे दोघे प्रयत्न करीत होते. या पदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी ते मे महिन्यांपासून प्रयत्न करत होते. या पदासाठी आधी गाडेकर यांनी आपले राजकीय लागेबांधे वापरुन ती जागा मिळविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील निकाळजे यांनीही त्यांचा राजकीय संबंधाचा वापर करण्यास सुरुवात केली. याची चर्चा थेट पोलीस महासंचालकांच्या कार्यालयापर्यंत पोहचली.

एकाच जागेसाठी दोन निरीक्षकांची दोन वेगवेगळ्या राजकीय व्यक्तीं शिफारस केल्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शनिवारी रात्री ११ वाजता दोघांचीही पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश जारी केले.
या बदल्यांची जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे. क्रीम पोस्टिंग मिळविण्यासाठी राज्यात सर्वच जिल्ह्यात तसेच पोलीस आयुक्तालयात चढाओढ सुरु असते. त्यासाठी पोलीस अधिकारी वेगवेगळया उपाय योजना करत असतात. मात्र, बदलीसाठी राजकीय संबंधाचा वापर करणाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी या बदल्यांद्वारे एक इशारा दिल्याची चर्चा पोलीस खात्यात रंगू लागली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –