विमान जप्त झाल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ‘नाचक्की’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मलेशियाने पाकिस्तानचे प्रवाशी विमान बोईंग ७७७ मागील आठवड्यात जप्त केले. यानंतर आंतराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की झाल्याचे समोर आले होते. पाकिस्तानने व्हिएतनामची पेरेग्रीन एव्हिएशन चार्ली लिमिटेकडून हे विमान भाडेतत्वावर घेतले होते. मात्र, रक्कम न चुकवल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली होती.

आंतराष्ट्रीय स्तरावर अपमान झाल्यानंतर पाकिस्तानने आता भाडेतत्वाची रक्कम चुकवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सनं पेरेग्रीन एव्हिएशन चार्ली लिमिडेटसोबत न्यायालयाच्या बाहेरच तडजोड केली आहे. पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री गुलाम सरवर खान यांनीही वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विमानावरील वादावरून लंडन न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान हा वाद सोडवला जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या विमानाच्या देखभालीसाठी लागणारी १.४ कोटी डॉलर्सची रक्कम पाकिस्तानने चुकवली नव्हती. मलेशियाच्या न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर हे विमान क्वालालंपूर विमानतळावर जप्त करण्यात आलं होतं. तेव्हा विमानात तब्बल १७२ प्रवासी आणि विमानातील कर्मचारी सुद्धा होते. त्यानंतर मलेशियात अडकलेल्या प्रवाशांना आणि कतारच्या विमानांमधून इस्लामाबादमध्ये आणण्यात आलं.

पाकिस्तान इंटरनॅशन एअरलाईन्स आणि पाकिस्तानी दुतावासातील कर्मचाऱ्यांनी आपल्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली नाही. आपल्याला दोन दिवस क्वालालंपूर विमानतळावरच झोपावं लागल्याचा दावा काही प्रवाशांनी केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम चुकवता आले नसल्याचे पाकिस्तानने यापूर्वी म्हटले. तर मलेशियाच्या न्यायालयानं पाकिस्तान इंटरनॅशन एअरलाईन्सचं म्हणणं न ऐकताच एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोपही पाकिस्ताननं केला होता. त्यामुळेच प्रवाशांनाही नाहक त्रास सोसावा लागल्याचं पाकिस्ताननं सांगितले. रक्कम चुकवल्यानंतर बोईंग ७७७ पाकिस्तानात येईल असे संकेत पाकिस्तानच्या मंत्र्यांनी दिले. तसच भाडेतत्त्वावर मोठी रक्कम देऊन हे विमान घेतल्याप्रकरणी त्यांनी यापूर्वीच सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं.