PIB च्या मुख्य महासंचालकांना ‘कोरोना’ची लागण, दिसले होते ‘या’ 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – प्रेस इन्फर्मेशन ब्युरोचे (पीआयबी) मुख्य महासंचालक के. एस. धतवालिया यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. धतवालिया यांना सायंकाळी सात वाजता एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले. ट्रॉमा सेंटरमध्ये विशेषत: कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार केला जात आहे. मात्र, त्यांच्या आरोग्याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय मीडिया केंद्र (एनएमसी) बंद करण्यात आले आहे, जेथे धतवालिया यांचे कार्यालय आहे. सोमवारीसुद्धा ते बंद राहणार आहे. कारण पूर्ण इमारत संसर्गमुक्त करण्यात येणार आहे. मंगळवारीसुद्धा एनएमसी बंद राहण्याची शक्यता आहे. कारण नियमानुसार त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याची व्यापक मोहिम सुरू करण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की, एनएमसी पूर्णपणे संक्रमणमुक्त करणे आणि ते पुन्हा उघडेपर्यंत प्रेस कॉन्फरन्ससह पीआयबीची सर्व कामे शास्त्री भवनमध्ये होतील. धतवालिया हे बुधवारी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर यांच्यासोबत व्यासपीठावर होते, जेव्हा त्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती मीडियाला दिली होती.