Fact Check : ‘लॉकडाऊन’ दरम्यान सर्व रेशन कार्डधारकांना मिळणार 50000 रूपये ? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून त्यात भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना सुरू केली असल्याचा दावा केला आहे. या योजनेंतर्गत सरकार सर्व रेशनकार्डधारकांना ५० हजार रुपयांचे मदत पॅकेज देत आहे. यासाठी एका लिंकवर जाऊन नोंदणी करण्यास सांगितले आहे. त्यात असेदेखील म्हटले गेले आहे कि रेशनकार्डधारकांना ५० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले जातील.

प्रथम या, प्रथम घ्या या तत्वावर मिळणार पैसे

व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला गेला आहे की राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार अंतर्गत भारतातील ज्येष्ठ नागरिक, विधवा, शेतकरी, रोजंदारी, बेरोजगार आणि सर्व रेशनकार्डधारकांना पैसे मिळतील. ही योजना प्रथम या, प्रथम घ्या या तत्त्वावर उपलब्ध आहे आणि याचा लाभ फक्त पहिल्या ४०,००० अर्जदारांना मिळेल. मदत पॅकेजचे ५० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले जातील.

जाणून घ्या काय आहे सत्य?

भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (पीआयबी) या वृत्ताला अफवा म्हटले आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘दावा केला जात आहे की सरकारने राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये सर्व रेशनकार्डधारकांना ५०,००० रुपयांचे मदत पॅकेज देण्यात येईल. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये ही बातमी चुकीची निघाली आहे. अशी कोणतीही योजना भारत सरकारने सुरू केलेली नाही. अशा बनावट साइट्सपासून सावध रहा आणि बनावट साइट आपली वैयक्तिक माहिती जमा करत आहे.’