‘त्यांनी’ काळे सोने लुटले, व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळल्याने तिघांचा मृत्यू

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारात निळवंडे धराणाच्या कालव्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात काळे सोने म्हणजेच वाळू वाहतूक करणारे वाहन कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.28) सकाळी घडली.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सध्या राजरोसपणे काळे सोने समजल्या जाणाऱ्या वाळूची अवैध तस्करी सुरु आहे. तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदीतून सध्या राजरोसपणे वाळू तस्करी सुरु आहे. वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवरातील खंडोबा मंदिराजवळ आज पहाटे पिकअप 207 या मधून चोरटी वाळू वाहतूक करत असताना कॅनॉलच्या खड्ड्यामध्ये पिकअप पलटी झाली.

या अपघातात दोन मजुर आणि वाहन चालक असे तीनजण जागीच ठार झाले आहेत. तर एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृत तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले तर गंभीर जखमी मजुराला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून पुढील तपास पोलीस करत आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच तालुक्यात वाळू तस्करांचा सुरु असलेला उच्छाद प्रशासनासाठी डोके दुखी ठरत आहे. वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.