पाकिटमार महिलांना रंगेहाथ पकडले

नगर : पोलीसनामा आॅनलाइन – सिंदखेडा-पुणे बसमध्ये पाकीटमारी करणाऱ्या श्रीरामपूर येथील दोन चोर महिलांना राहुरी तालूका पोलिस ठाणे हद्दीत प्रवाशांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिला अनेक महिन्यांपासून प्रवाशांचे खिसे साफ करत होत्या. परंतु, त्या पोलिसांना सापडत नव्हत्या. अखेर प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे या पाकिटमार महिल्या रंगेहाथ सापडल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिंदखेडा-पुणे बस क्रमांक एम.एच. २० बी. एल ३४१४ ही बाभळेश्वर बस स्थानकात असताना या ठिकाणी एक महिला एका छोट्या मुलांसह बसमध्ये बसली. बस कोल्हार बसस्थानकात आली असता दुसरी एक महिला बसमध्ये बसली. यावेळी राजेंद्र दामोधर काळे(रा. गांधी चौक, संगमनेर) हेही बसमधून प्रवास करत होते. बाभळेश्वर येथून बसलेल्या महिलेने राहुरी तालुक्यातील कोल्हार दरम्यान बसमधील गर्दीचा फायदा घेऊन धक्काबुक्की करत राजेंद्र काळे यांच्या खिशातील सुमारे एक लाख रूपये चोरण्याचा प्रयत्न केला. सदर घटना काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलेला नोटांसह रंगेहाथ पकडले. या महिलेच्या हातून नोटा परत घेताना दोन हजारच्या काही नोटा फाटल्या.

यावेळी कोल्हार येथून बसलेल्या दुसऱ्या महिलेने मुलाला उलटी होत आहे, बस थांबवा असे म्हणून बसमध्येच धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील काही प्रवाशी महिलांनी त्या दोन महिलांना पकडून ठेवत चांगलाच चोप दिला. बस राहुरी बसस्थानकात आणल्यानंतर या घटनेची माहिती राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच अंकुश बर्डे यांनी राहुरी पोलिसांना दिली. बस राहुरी बस स्थानकात येताच हवालदार साहेबराव चव्हाण, कल्लू चव्हाण, वैभव पांढरे यांनी या पाकिटमार महिलांना ताब्यात घेतले. यावेळी पाकिटमार महिलांनी गयावया करत सोडून देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल केला. या दोन्ही महिला श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचे समजते. गेल्या अनेक महिन्यांपासून बसमध्ये त्या पाकीटमारी करत होत्या.