पिकअप-दुचाकीच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

बार्शी (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – कुर्डुवाडीहुन लातूरकडे भरधाव वेगात निघालेल्या पिकअपने समोरुन येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील खांडवी गावाजवळ झाला.

याबाबत पोलीसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, कुर्डूवाडीहुन लातूरकडे शेळ्या घेऊन जात असलेल्या पिकअप जीप (एमएच २४ एबी ५४०५) बार्शीजवळील खांडवीजवळ भरधाव वेगात आली असता समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला आहे, यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी बार्शी येथील जगदाळेमामा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एमएच ११, ८१०७ या दुचाकीवरील इसमांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी बार्शी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नागरिकांनी जखमी इसमाला उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर या मार्गावरील वाहतुक खोळंबली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
जळगाव :
राष्ट्रीय महामार्गावर जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विजय किल्लेदार (४४, रा. जामनेर रोड, भुसावळ) हे जखमी झाला.हा अपघात तरसोद फाट्यानजीक झाला. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजय किल्लेदार हे जळगावकडून घरी भुसावळकडे दुचाकीने जात असताना समोरुन येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात किल्लेदार यांच्या डोक्याला दुखापत झाली. यादरम्यान किल्लेदार यांच्या घरानजीकच राहणारे लीलाधर पाचपांडे हे भुसावळकडे जात होते. त्यांनी किल्लेदार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. सदर कारचा क्रमांक एम.एच. १९, बीजे – ३३३३ असा असल्याची माहिती पाचपांडे यांनी दिली.