शास्त्रज्ञांचे यश ! मृत डुकरांचे मेंदू चार तासांनी कार्यरत

पोलीसनामा ऑनलाइन – मेंदू या अवयावरील संशोधनात शास्त्रज्ञांना खूप मोठे यश आले आहे. एखाद्या सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर प्रथम त्याचा मेंदू आपले कार्य थांबवतो. मात्र, या नव्या संशोधनात आलेल्या यशाने या वैद्यकीय धारणेला छेद दिला आहे. अमेरिकेतील येल विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले असून अल्झायमरसारख्या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना यामुळे भविष्यात जीवदान मिळू शकते.

या संशोधनाने अल्झायमरसारख्या आजारावर उतारा शोधणाऱ्या संशोधनाला गती मिळली असली तरी मृत मेंदूचे पुनरुज्जीवन करता येत नाही, असे मानून अवयवदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रक्रियेचाही पुनर्विचार करावा लागणार आहे. या संशाधनासाठी प्रा. नेनाद सेस्टन आणि त्यांच्या टीमने कत्तालखान्यातून बत्तीस डुकरांचे मेंदू मिळविले आणि ते मृत्यूनंतर चार तासांनी कृत्रिम रक्त, प्राणवायू आणि अन्य औषधांपासून बनविलेल्या विशिष्ट द्रवामध्ये ठेवले. तसेच त्याला सातत्याने योग्य प्रमाणात झटकेही देण्यात आले.

या प्रक्रियेदरम्यान मेंदूतील पेशींच्या झपाट्याने मृत होण्याला अटकाव करता आला. तसेच काही रक्तवाहिन्या आणि मेंदूच्या काही क्रियांचे पुनरुज्जीवनही झाले. विशेष म्हणजे या प्रक्रियेत वापरण्यात आलेले मृत मेंदूही जिवंत मेंदूंइतकेच प्राणवायू वापरत असल्याचे दिसून आले. शिरच्छेदानंतर तब्बल १० दहा तासांपर्यंत ही स्थिती होती. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मेंदूचे सजग असण्याचे किंवा तत्परतेने प्रतिसाद देण्याचे मुख्य कार्य मात्र पूर्ववत सुरू करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. त्यामुळे हे संशोधन सध्या प्राथमिक आवस्थेत आहे.

परंतु, या अभ्यासामुळे मेंदूच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे. आतापर्यंत अशी समजूत होती की, मृत्यूनंतर काही वेळात मेंदूतील पेशी आणि पर्यायाने मेंदूही मृत होतो. पण या संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, मेंदूतील पेशी आणि विविध घटक टप्प्याटप्प्याने मृत होतात आणि योग्य प्रयत्न केल्यास हे त्यांचे मृत होणे काही काळ रोखून धरता येते. तसेच काही पेशी पुनरुज्जीवितही करता येतात.