सैफ अली खानला ‘डुक्कर’ शिकार पडणार महागात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

काळवीटाची शिकार केल्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या सैफ अली खानला डुक्कराची शिकार करण महागात पडू शकतं. बुल्गेरिया देशात फिरायला गेलेल्या सैफ अली खानने एका जंगली डुकराची शिकार केली. याप्रकरणात त्याला बुल्गेरिया देशाने इंटरपोलतर्फे नटीस बजावली आहे. देशातील प्रमुख तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयकडे ही नोटीस देण्यात आली असून ही नोटीस मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमार्फत सैफ अली खानला बजावण्यात येणार आहे.

सैफ अली खान हा बुल्गेरियामध्ये फिरायला गेलेला असताना त्याने एक जंगली डुक्कर मारलं होतं. बुल्गेरियामध्ये शिकारीची परवानगी आहे, मात्र त्यासाठी परदेशी नागरिकांना त्यांच्या देशातील शिकारीचा परवाना सादर करणं किंवा शिकारीसाठी तिथली परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. या दोन्ही अटींचं सैफ अली खानने पालन केलेलं नाही.

हिंदुस्थानात शिकारीवर बंदी घालण्यात आलेली असून कोणत्याही प्राण्यांची सामान्य माणसाला शिकार करता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वनविभागाचे अधिकारी पिसाळलेल्या प्राण्यांना ठार मारू शकतात, मात्र त्यासाठी वरिष्ठांची रितसर परवानगी घेणं आवश्यक असतं. सैफची अजून चौकशी झालेली नाही मात्र या प्रकरणी त्याची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.