10 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – डुक्कर चोरीच्या गुन्ह्यामध्ये संशयिताला मदत करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी करण्यात आली. या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब केशव पाटील (रा. इस्लामपूर) आणि सतीश मारूती माळी (रा. मिरज) अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लाच घेताना रंगहाथ पकडण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब पाटील आणि पोलीस हवालदार सतीश माळी हे दोघे इस्लामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. इस्लामपूर पोलीसंनी डुक्कर चोरीच्या संशयावरुन एकाला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या नातेवाकाकडे दोघांनी 10 हजार रुपयांची मागणी केली. नातेवाईकांनी याची तक्रार सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पथकाने आज दुपारी इस्लामपूर पोलीस ठाण्यात सापळा रचून दोघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : policenama.com