दहापट वाढीव वीज बिल आलं व्यावसायिकास, घेतली उच्च न्यायालयात धाव

पोलीसनामा ऑनलाईन टीम  – लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी ग्राहकांना जून महिन्याची वाढीव बिले पाठवून ’शॉक’ दिला आहे. कामधंदा बंद असल्यामुळे आधीच चिंतेत असलेला सर्वसामान्य ग्राहक त्यामुळे अधिकच चिंतातूर झाला आहे. मुलुंडमधील एका व्यावसायिकाला तर सरासरी बिलाच्या तब्बल 10 पट जास्त बिल आल्यामुळे त्यांनी आता हायकोर्टाचे दरवाजा ठोठावले आहेत.

राज्य सरकार आणि ऊर्जा खात्याने सध्याच्या काळातील बिल आकारणीसाठी एक नियमावली तयार करावी, जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर या महिन्यात वीज बिलात सूट देत बिल उशिराने भरल्यास आकारण्यात येणारा दंड आकारू नये, असे निर्देश हायकोर्टाने देण्याची मागणी केली आहे. 2020 मार्च ते 2020 मे या कालावधीत अनेक ग्राहकांना वीज कंपन्यांनी फुगलेली वीज बिले पाठवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यासंदर्भात मुलुंडमधील व्यावसायिक रवींद्र देसाई यांना त्यांच्या सरासरी बिलाच्या दहापट जास्त बिल पाठवले आहे.

या प्रकरणी त्यांनी अ‍ॅड. विशाल सक्सेना यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात एमएसईडीसीएल, अदानी आणि टाटा पॉवर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. लॉकडाऊनमध्ये आधीच लोकांचे नुकसान झालेले असताना अशाप्रकारे वाढीव वीज बिल पाठवून कंपन्यांकडून एकप्रकारे ग्राहकांची लुबाडणूक सुरू असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केलेला आहे.