पुणे : चालकासोबत आता सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती

वाहतुक पोलिसांकडून कारवाईचा बडगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुचाकीचालकांना हेल्मेटसक्तीवरून पुण्यात मागील तीन महिन्यात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आता दुचाकी चालकाबरोबर पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुचाकीवर जाणाऱ्या सहप्रवाशानेही हेल्मेट घालावे असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे. तसेच याकडे दूर्लक्ष करणाऱ्यांवर येत्या काळात दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच हेल्मेट सक्ती विरोधावरून पेटलेले राजकारण आता डबल हेल्मेटसक्तीमुळे तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

पुण्यात मागील तीन महिन्यांपुर्वी हेल्मेट सक्तीची कारवाई तीव्र करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. १ जानेवारीपासून ती अधिक तीव्र झाली. त्यानंतर शहरात राजकिय प्रतिनिधी, नागरिक, हेल्मेट विरोधी संघटना यांनी आक्रमकपणे शहरात कारवाईला विरोध केला होता. यावेळी पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातले होते. तरीही शहरभर वाहतुक पोलिसांची चौकाचौकात कारवाई सुरुच आहे. त्यानंतर आता सहप्रवाशानेही हेल्मेट घालावे अशी सक्ती करण्यात आली आहे. यावर कारवाई करण्यासाठी पाच पथके नेमण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी हेल्मेट न वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहतुक शाखेच्या या पथकांकडून दिवसाप्रमाणेच रात्रीही कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात होणारे अपघात हे वाहतुकीच्या नियमभंगामुळेच होत आहेत. असे निदर्शनास आले आहे. त्यात हेल्मेट न घातल्याने दुचाकीचालकांना अपघातात प्राण गमवावे लागत आहेत. विश्रांतवाडी आणि नगर रस्त्यावर झालेल्या अपघातात मागील दोन दिवसांत सहप्रवासीदेखील गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी चालकासोबतच सहप्रवाशांनीही हेल्मेट घालणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे आता कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.